चलो अयोध्या! उद्धव ठाकरे उद्या अयोध्येत

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी अयोध्येला जाणार आहेत. अयोध्येत रामजन्मभूमीवर विराजमान प्रभू रामचंद्रांचे दर्शन ते घेणार आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून हजारो शिवसैनिकांनीही अयोध्येकडे कूच केले आहे. उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत येत असल्याने अयोध्यावासीयांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अयोध्येत त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱयात त्यांच्यासोबत राज्य मंत्रिमंडळातील सदस्य तसेच अनेक खासदार आणि आमदारही असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने 100 दिवस पूर्ण केले असतानाच उद्धव ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा होत आहे. या दौऱयाचे नियोजन करण्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे गुरुवारीच अयोध्येत पोहोचले. संजय राऊत यांनी अयोध्येतील जिल्हा दंडाधिकारी अनुज कुमार झा यांची भेट घेऊन त्यांना उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली.

मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध जिल्हय़ांमधून शिवसैनिकांचे जथे अयोध्येला रवाना झाले आहेत. आज दुपारी कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शिवसैनिकांना घेऊन विशेष रेल्वे अयोध्येला रवाना झाली. ही गाडी प्लॅटफॉर्मवरून निघाली तेव्हा ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी स्थानकाचा परिसर दुमदुमला. शिवसैनिकांनी 18 डब्यांची ही विशेष गाडी ऑनलाइन बुक केली होती असे रेल्वे अधिकऱयांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी जून 2019 मध्ये 18 खासदारांसह अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी अयोध्या नगरीत त्यांचे जंगी स्वागत झाले होते. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते अयोध्येला जात असल्याने देशविदेशातील प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या या दौऱयाबद्दल उत्सुकता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या