रामजन्मभूमीचा निकाल 5 नोव्हेंबरला,सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme-court

अयोध्या प्रकरणातील अंतिम सुनावणी बुधवारी म्हणजेच आज होणार असून 4 किंवा 5 नोव्हेंबरला रामजन्मभूमीचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या ऐतिहासिक निकालाकडे हिंदुस्थानसह अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे 6 ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणी नियमित सुनावणी सुरू आहे. 17 ऑक्टोबरला सुनावणीचा शेवटचा दिवस असेल, असे यापूर्वी सरन्यायाधीश गोगोई यांनी जाहीर केले होते. मात्र आता बुधवारीच (दि. 16) अंतिम सुनावणी होईल. या वेळी हिंदू आणि मुस्लिम पक्षकार एकमेकांना प्रश्नोत्तरे करतील, असे स्पष्ट केले. त्यानंतर गुरुवारी मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा होईल.

निवृत्तीपूर्वीच सरन्यायाधीश फैसला देतील
रामजन्मभूमीचा खटला ऐतिहासिक आहे. अवघ्या जगाचे लक्ष हिंदुस्थानच्या सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहे. सरन्यायाधीश गोगोई हे 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वीच रामजन्मभूमीचा निकाल लागेल. 4 किंवा 5 तारखेला निकाल लागू शकतो, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. दरम्यान, या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमावबंदी आदेश लागू केला असून सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ केली आहे.

मुस्लिमांसाठी 60 मशिदी; हिंदूंकरिता एकच रामजन्मभूमी
मुस्लीम त्यांना हव्या त्या मशिदीत नमाज अदा करू शकतात. एकटय़ा अयोध्येत 55 ते 60 मशिदी आहेत; पण हिंदूंसाठी रामजन्मभूमी एकच आहे. आम्ही याशिवाय दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही, असे ‘रामलल्ला विराजमान’च्या वतीने वरिष्ठ वकील के. पारसरन यांनी आज न्यायालयाला सांगितले. मोगल आक्रमक बाबरने रामजन्मभूमीवर मशीद उभारून मोठी चूक केली. हिंदुस्थानचा गौरवशाली इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. ऐतिहासिक चूक सुधारण्याची वेळ आता आली आहे, असेही पारसरन यांनी सांगितले.

मुस्लीम पक्षकारांना न्यायालयाच्या कानपिचक्या
सर्वोच्च न्यायालय केवळ आम्हालाच अधिक प्रश्न विचारते. त्या तुलनेत हिंदू पक्षकारांना कमी प्रश्न विचारले जातात, असा आक्षेप नोंदवणारे मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांना सरन्यायाधीश गोगोई यांनी कानपिचक्या दिल्या. मिस्टर धवन, हिंदू पक्षकारांना आम्ही पुरेसे प्रश्न विचारतोय ना, असा प्रश्न सरन्यायाधीशांनी त्यांना केला. त्यावर निरुत्तर झालेल्या धवन यांनी आम्हाला असे म्हणायचे नव्हते, अशी सारवासारव केली.