
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या आवारातील उत्खननात एवढे पुरावे सापडले आहेत की, कथित मशिदीच्या खाली एक भव्य वास्तू होती व ती वास्तू मंदिराचीच होती हे त्यावरून स्पष्ट होते, असा जोरदार युक्तिवाद ‘रामलल्ला विराजमान’चे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केला. त्यांनी पुरातत्त्व खात्याच्या अहवालातील संदर्भ व छायाचित्रेही सादर केली.
अयोध्या प्रकरणाच्या 36व्या दिवसाची सुनावणी गुरुवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठापुढे झाली. या वेळी ऍड. वैद्यनाथन यांनी जोरदार युक्तिवाद करताना उत्खननातील भक्कम पुरावे सादर केले. हिंदूंच्या मंदिरात पूजाअर्चा, अभिषेकचे पाणी वाहून जाण्यासाठी मगरीच्या आकाराचा विशिष्ट प्रकारचा मार्ग केला जाते. हा मार्ग हिंदूंच्याच मंदिराचे प्रतीक मानले जाते, असेही ऍड. वैद्यनाथन यांनी सांगितले.
मुख्य घुमटाखालीच प्रभू रामचंद्रांचा जन्म
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी ‘रामलल्ला विराजमान’च्या वकिलांना सवाल केला की, गुरुनानकसुद्धा अयोध्येला गेले होते का? त्यावर ऍड. वैद्यनाथन यांनी प्रभू रामचंद्रांच्याच जन्मभूमीचा दावा केला. प्रभू रामचंद्र यांचा जन्म कथित मशिदीच्या मुख्य घुमटाखालीच झाला होता हा लोकांचा विश्वास आहे, असे सांगून वैद्यनाथन यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला.
मग याआधी काय कसोटी खेळत होता का – सर्वोच्च न्यायालय
निर्मोही आखाडय़ाचे वकील सुशील जैन यांनी सध्या या खटल्याची सुनावणी क्रिकेटच्या ट्वेण्टी-20 सामन्यांप्रमाणे होत असल्याचे मत मांडले. त्यावर न्यायालय संतापले. आता ट्वेण्टी-20 चाललीय म्हणता, मग याआधी काय कसोटी खेळत होता का, अशी संतप्त विचारणा करत न्यायालयाने ऍड. जैन यांना धारेवर धरले.
























































