#AYODHYAVERDICT- अयोध्येत राम मंदिर बनणार, मशिदीसाठी स्वतंत्र 5 एकरांची तरतूद

697

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत अयोध्येत राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने केंद्र सरकारला तीन महिन्यांमध्ये ट्रस्टची स्थापना करून राम मंदिराच्या निर्माणासाठी देण्याचे आदेश दिले. तसंच, केंद्र सरकारने सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद उभारण्यासाठी अयोध्येतच पाच एकर पर्यायी जमीन द्यावी, असेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात सकाळी 10.30 वाजता निकाल वाचनास सुरुवात केली. न्यायालयाने पुरातत्व विभागाने सादर केलेले पुराव्यांवर संपूर्णपणे विश्वास ठेवत आपला निर्णय दिला. निकालामध्ये न्यायालयाने आपण शिया तसेच सुन्नी वक्फ बोर्डासह निर्माही आखाड्याचीही याचिका फेटाळत असल्याचे सांगितले. याशिवाय न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा वादग्रस्त जागेचे तीन तुकडे करण्याचा निर्णय अतार्किक असल्याचे म्हटले. सुन्नी वक्फ बोर्डाचे सगळे दावे फेटाळून लावत सगळी वादग्रस्त जागा रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्मोही आखाड्याचा दावाही फेटाळला असून केंद्र सरकारला मंदिराच्या निर्मितीसाठी गठित करण्यात येणाऱ्या समितीला योग्य प्रतिनिधित्व मिळावं, असे आदेश दिले आहेत.

मुस्लीम पक्षकार या जमिनीवरील आपला एकाधिकार स्पष्ट करू शकले नाहीत. त्यामुळे पाच सदस्यीय घटनापीठाने मुस्लिमांना अयोध्येतच 5 एकर पर्यायी जागा देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या