देशातील पहिले आयुर्वेदिक चिकन, चंद्रपुरातील दांपत्याचा भन्नाट प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • अभिषेक भटपल्लीवार

चिकन म्हटलं की मांसाहारी लोकांच्या तोंडाला पाणी सुटते… हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये चिकनच्या वेगवेगळ्या डिशेसही मिळतात… परंतु सध्या चर्चा आहे ती आयुर्वेदिक चिकनची… ऐकून धक्का बसला ना. पण हे खरे असून चंद्रपुरातील एका गावात चक्क आयुर्वेदिक चिकन मिळतेय आणि खवय्ये त्यावर तुटूनही पडताहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धाबा गावात झाडे दांपत्याने आयुर्वेदिक चिकनचा हटके प्रयोग केला आहे. निलेश झाडे आणि त्यांची पत्नी प्रगती झाडे यांची दहा-पंधरवा वर्षांपूर्वी एक खानावळ होती. स्वयंपाक करणे हा निलेशचा छंद असून याच छंदातून रोजच्या भाज्यात काहीतरी बदल करून त्यास अधिक रुचकर करण्याचा प्रयत्न निलेश यांचा होता आणि यातूनच आयुर्वेदिक चिकनची निर्मिती झाली.

जुन्या काळात ग्रामीण भागामध्ये ताप आल्यानंतर जिभेची चव जायची तेव्हा कुटुंबातील व्यक्ती सौदा मसाल्यामध्ये (आयुर्वेदिक मसाले आणि जडी-बुटींपासून बनवलेला मसाला) चिकन किंवा चिकन सूप बनवायचे. यात जवळपास 25 ते 30 प्रकारचे आयुर्वेदिक मसाले असायचे. काळी कोंबडी किंवा काळा कोंबडा यासाठी निवडला जायचा. फ्रिजमध्ये न ठेवता हे चिकन चार ते पाच दिवस टिकायचे. आरोग्यासाठी हे चिकन लाभदायक असल्याचे जुनी जाणती लोक सांगतात.

आयुर्वेदिक चिकन नाव असे पडले

निलेश यांची दिवंगत आजी ठमाबाई झाडे यांना आयुर्वेदिक औषधांची माहिती होती. सौदा मसाल्यामध्ये त्या चिकन बनवायच्या. आजींचा हा वारसा पुढे चालवत निलेश यांनी सौदा मसाल्यात आणखी काही आयुर्वेदिक बुटींचा वापर केला. त्यामुळे या मसाल्याची चव आणखीनच रुचकर झाली. खानावळीत आलेल्या एका अधिकाऱ्याला त्यांनी सौदा मसाल्यातील चिकन खावू घातले आणि तेव्हापासून याचे नाव आयुर्वेदिक चिकन पडले.

आरोग्यास गुणकारी

मानवी शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे दोष असतात. यापैकी एकाचेही संतुलन बिघडले तर आरोग्य बिघडते. या दोषामुळे होणाऱ्या आजारांवर आयुर्वेदिक चिकन गुणकारी असल्याचे बोलले जाते. आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या बुटींचा वापर आम्ही मसाल्यामध्ये करतो, त्यामुळे हे चिकन किती गुणकारी आहे हे नक्की सांगू शकत नाही. मात्र एक नवीन चव म्हणून तुम्ही याची चव घेऊ शकता, असे निलेश झाडे यांनी सांगितले.

आयुर्वेदिक पाणीपुरी खा अन् आजार पळवा! नाशिकमधील दत्तू शेळके यांचा हटके प्रयोग