Azam Khan आझम खान तुरुंगातूनच निवडणूक लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमिन माफिया प्रकरणात तुरुंगात कैद असलेले समाजवादी पार्टीचे नेते व खासदार आझम खान हे तुरुंगातूनच निवडणूक लढवणार आहेत. आझम खान यांच्या वतीने त्यांचे इलेक्शन एजंट असीम रजा यांनी त्यांचा नामांकन अर्ज आज निवडणूक आयोगाकडे सादर केला. आझम खान हे रामपूर मतदारसंघातून तर त्यांचा मुलगा अब्दुल्ला हा स्वार मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

आझम खान यांच्यावर एकूण 87 गुन्हे दाखल असून त्यातील दोन गुन्ह्यांसाठी ते तुरुंगवासात आहेत. ते 27 फेब्रुवारी 2020 पासून सीतापूर तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी तंजीन व मुलगा अब्दुल्ला आजम हे दोघे देखील त्यांच्यासोबत तुरुंगात होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांना जामिन मंजूर झाला व ते बाहेर पडले आहेत.

दरम्यान आता निवडणूकीसाठी अर्ज दाखल केल्याने आझम खान तुरुंगातून सुटणार की काय अशी चर्चा सध्या जनतेमध्ये रंगली आहे. आझम खान यांनी तुरुंगातून बाहेर येऊन निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली होती. त्यांनी प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर येण्याची परवानगी मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.