बाबासाहेब पुरंदरे यांना जीवनगौरव, फडणवीस, झिरवाळ, नीलम गोऱहे यांना ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आफ्टरनून व्हॉइस’ वृत्तपत्राच्या वतीने देण्यात येणाऱया जीवनगौरव पुरस्काराने आज ‘भारतरत्न’ लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मंदाकिनी आमटे, अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनाही 13 वा न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लता मंगेशकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, एमपीएससीचे सदस्य प्रताप दिघावकर, हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, अभिनेते मनोज वाजपेयी, अभिनेत्री राजश्री देशपांडे, वकील मृणालिनी देशमुख, वसंत शिंदे, डॉ. पराग तेलंग, रोहन दुआ, पत्रकार खलील गिरकर, पत्रकार संजय जोग, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सुशांत सिन्हा, चेतन सशीतल, पोलीस अधिकारी सुनील कडासने व उषा पटेल यांचादेखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन ‘आफ्टरनून व्हॉइस’ वृत्तपत्रातर्फे करण्यात आले होते. वर्तमानपत्राच्या मुख्य संपादिका वैदेही तमन यांनी सूत्रसंचालन केले.