बाबा सिद्दीकींचा ठावठिकाणा मोहित कंबोज यांनी हल्लेखोरांना सांगितला, शहझीन सिद्दीकींचा खळबळजनक आरोप

अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांची पत्नी शहझीन यांनी केली असून या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलामार्फत याचिका दाखल केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाट असून त्यांना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पोलीस तपासाबाबत धूळफेक करत असून राजकीय व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेते आणि उद्योजक मोहित कंबोज यांनी बाबा सिद्दीकी यांचे लोकेशन लीक केल्याचा खळबळजनक आरोपही शहझीन यांनी केला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.

गोळीबार करणाऱ्यांचा कोणताही वैयक्तिक हेतू नव्हता. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या हालचालींची खडा न खडा माहिती असल्याशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही. बाबा सिद्दीकी यांचे लोकेशन लीक झाल्याचा संशय असून कुटुंबियांना उद्योजक मोहित कंबोजवर संशय आहे. हत्या होण्याच्या काही तास आधी त्यांनी बाबा सिद्दीकींशी संवाद साधला होता. त्यांनीच बाबा सिद्दीकी यांचा ठावठिकाणा सांगितला असा असा आरोप शहझीन सिद्दीकी यांनी केला. तसेच पोलीस तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

बाबा सिद्दीकी झोपडपट्टीवासियांच्या हितासाठी झटत होते. त्यामुळेच अनेक विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी ते अडथळा ठरत होते. या दृष्टीकोनातून पोलिसांनी तपास केला नाही, असा आरोप शहझीन यांनी केला. संशयित गुन्हेगारांचे सत्ताधाऱ्यांशी लागेबांधे आहेत. म्हणून या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.