
शिवसेनेची विधानसभेतील ताकद वाढत असून आज प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू आणि राजकुमार पटेल या दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची या दोन आमदारांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली आणि पाठिंब्याचे पत्र दिले.
राज्यातील सत्तास्थापनेचे फटाके दिवाळीनंतरच फुटणार हे स्पष्ट असले तरी राजकीय हालचालींना मात्र कमालीचा वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकून भाजप मोठा पक्ष असला तरी सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्याच हातात आहेत. शनिवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व आमदारांनी शिवसेनेला सत्तेत फिफ्टी-फिफ्टी’ वाटा हवा, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवे असे ठामपणे म्हटले होते आणि तशी भाजपकडून लेखी हमी घ्या अशी मागणीही केली होती.
दोन अपक्ष आमदारांपाठोपाठ…
आज ‘प्रहार जनशक्ती’चे अचलपूर मतदारसंघातील आमदार बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. दोन दिवसांपूर्वीच रामटेकचे आशीष जयस्वाल आणि भंडारा मतदारसंघाचे नरेंद्र मेंडेकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे विधानसभेतील शिवसेनेची ताकद आता वाढू लागली आहे. शिवसेनेचे संख्याबळ 56 वरून 60 झाले आहे.
शिवसेनाच न्याय देईल!
शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोहयोतून व्हावीत, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करणे तसेच अचलपूर व मेळघाट मतदारसंघातील समस्या सोडवणे अशा अनेक मुद्दय़ांवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आणि शिवसेनाच राज्याला न्याय देऊ शकते हे पटल्यानेच त्यांना पाठिंबा दिल्याचे कडू यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. यावेळी शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.




























































