एक कोटीचा ठेका मात्र रस्ते दुरुस्ती खड्यात: मालवणातील मुख्य रस्त्यांची दूरावस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. १५० किलोमीटर लांबीच्या १३ मुख्य रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य अधिकच असून या रस्त्यावरून वाहन चालवणे मुश्किल बनले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे १ कोटी २० लाखाचा ठेका ३ वेगवेगळ्या ठेकेदारांना देण्यात आला. वर्क ऑर्डर देऊन २ महिने उलटले मात्र रस्ते दुरुस्ती न झाल्याने खड्यांची स्थिती अधिकच गंभीर बनली असून वाहन चालकाना धोकादायक अश्या खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागत आहे.

खड्डेमय रस्त्यात प्रामुख्याने मालवण-कसाल, मालवण-कुडाळ, ओझर-कांदळगाव-मसुरे, मालवण-तारकर्ली-देवबाग यासह अन्य १० असे एकूण १३ मुख्य रस्ते अधिकच खड्डेमय आहेत. वर्षभर कालावधीसाठी या रस्त्यांवरील खड्डे बुजवणे यासाठी जांभा दगड व डांबरीकरण अशी तरतूद आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे जांभ्या दगडाने बुजवणे अपेक्षित होते. मात्र काही किरकोळ ठिकाणी जांभ्या दगडाची थुकपट्टी वगळता खड्डे जैसे थे अशी स्थिती राहिली. पावसानंतर रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून बुजवणे असे ठेक्यात नमूद आहे. मात्र कोणत्याही रस्त्यावर अद्याप डांबरीकरणाने खड्डे बुजवण्याचा शुभरंभ झाला नाही.

रस्त्याची साईडपट्टी व गटारे सुस्थितीत ठेवणे ठेक्यात नमूद आहे. मात्र अनेक ठिकाणी रस्त्यांना साईडपट्टीच नसल्याची स्थिती आहे. तर गटारेही अस्तित्वात नाहीत. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने मसुरे मार्गावरील रस्त्यावर लाल माती व बारीक दगड पसरले आहेत. ते हटवणे तसेच साईडपट्टी दुरुस्ती बाबतही कोणतीही कार्यवाही ठेकेदाराकडून झाली नाही. दिशादर्शक फलक सुस्थितीत ठेवणे अपेक्षित असताना त्या बाबतही कोणतीही कार्यवाही कोणत्याही रस्त्यावर नाही. अशी स्थिती आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार का?
दोन महिन्यांपूर्वी रस्ते दुरुस्तीचे ठेके देण्यात आले. मात्र ठेकेदारावर बांधकाम विभागाचा कोणताही अंकुश नसल्याने रस्त्यांवरील खड्डे अधिकच वाढले आहेत. खड्डयांमुळे अपघात घडत असून वाहन चालकांना वाहन चालवणे मुश्किल बनले आहे. मात्र रस्ते दुरुस्ती हाती घेण्यात आली नाही.

जिल्हापरिषद रस्त्यांचीही तीच स्थिती
मालवण तालुक्यात ग्रामीण भागात गावोगावी जिल्हापरिषद मालकीच्या असलेल्या रस्त्यांचीही दयनीय स्थिती काही. काही नवे रस्ते वगळता सर्वच रस्ते खड्डेमय आहेत. नव्याने केलेल्या रस्त्यावरही अवघ्या काही महिन्यातच खड्डे पडत असल्याने वाहन चालकांचा प्रवास रस्त्यातून नव्हे तर खड्यातून बनला आहे.

पर्यटकांचा प्रवासही खड्यातच
दिवाळी पासून खऱ्या अर्थाने मालवणच्या पर्यटनास सुरवात होणार आहे. मात्र मालवणच्या प्रवेशद्वार तसेच वायरी-तारकर्ली-देवबाग हे रस्ते अधिकच खड्डेमय बनल्याने पर्यटकांनाही याच रस्त्यातून प्रवास करावा लागण्याची स्थिती आहे. तरी तात्काळ रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.