बदामीतील गुंफा!

1015

>> द्वारकानाथ संझगिरी

खिद्रापूरचं मंदिर पाहून मी बदामीला गेलो. बदामीची मंदिरं खिद्रापूरपेक्षा नक्कीच पुरातन आहेत. किंबहुना, त्या गुंफा आहेत. डोंगरात कोरलेल्या! मी जवळ जवळ पंचेचाळीस वर्षांनी तिथे जात होतो. आधी तिथे गेलो तेव्हा मी लेखक नव्हतो. माझा पुरातन वास्तूचा अनुभव आणि अभ्यास मर्यादित होता. मी फक्त एक प्रवासी होतो. आता मी प्राथमिक शाळेतला पुरातन वास्तू विषयातला विद्यार्थीसुद्धा आहे. ख्रिस्तानंतर 540 ते 600 या काळात लाल सॅण्डस्टोनमध्ये कोरलेल्या गुंफा आणि त्यातल्या मूर्ती मी पाहत होतो. नक्कीच खिद्रापूरच्या अलीकडचा तो काळ! त्या पाहायला डोंगर चढावा लागतो. पहिला टप्पा चढल्यावर गाईडने मला सांगितले. ‘‘राऊडी राठोड’मधली शेवटची मारामारी समोरच्या डोंगरावर शूट केलीय.’’ मला सिनेमात ही जागा भन्नाट आवडली होती. मी म्हटलं, ‘‘तिथे वर जाता येईल?’’ तो म्हणाला, ‘‘गाडी नाही जाणारं, चढावं लागेल.’’ मी शस्त्र खाली ठेवली. माझे हायकिंगचे दिवस संपल्याची जाणीव झाली होती. मूळ गुंफेच्या पायऱया चढतानाच शरीर सांगत होतं, ‘‘साहेब, दमाने घ्या. विशीत नाही तुम्ही.’’

साधारण इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पोहोचल्यावर पहिलं मंदिर लागलं. अर्थात देऊळ म्हणजे दगडात कोरलेला सभामंडप एवढीच त्याची व्याप्ती. आधारासाठी उभारलेल्या खांबाने त्याला एक वेगळं सौंदर्य बहाल केलंय. सभामंडपाच्या आत एक गाभाऱयासारखी खोली होती. आता एवढी मंदिरं, गुंफा पाहिल्यानंतर आत जाताना काय अपेक्षा ठेवायची हे मला ठाऊक असतं. आपल्या अपेक्षेप्रमाणे तशा मूर्ती असतातसुद्धा. पण त्यातल्या एखाददोन मूर्ती त्याच्या भव्यतेमुळे किंवा बारीक शिल्पकलेमुळे, मूर्तीच्या चेहऱयावरच्या भावामुळे आपल्या मनात कोरल्या जातात. त्यातली एक आहे या पहिल्या गुंफेतली नटराजाची मूर्ती. नृत्याच्या पोझमधला शिव ! हे शिवाचं रूप सर्वत्र आहे. मी बालीत पाहिलंय, ते कंबोडियातही आहे असं मी ऐकलंय. त्याच्या डाव्या मागच्या हातात अग्नी असतो, एका हातात साप असतो आणि एक डमरूही असतो. हा बदामीचा नटराज चक्क अठरा हातांचा आहे. तो पाच फूट उंच आहे. हे अठरा हात नाटय़मुद्रा दाखवतात. ऍलिस बोनट ही एक स्वित्झर्लंडची इतिहासतज्ञ आणि इंडोलॉजिस्ट आहे. तिच्या मते नटराज कालचक्र दाखवतो. या नटराजाचा प्रत्येक हात एका वेगळय़ा नाटय़मुद्रेचं दर्शन देतो. अर्थात काही हातात त्रिशूळ, सर्प, डमरू, ज्योत वगैरे आहेतच. त्या नटराजाच्या पायाशी नंदी आणि गणपती आहेत. त्याच्या बाजूला दुर्गेची मूर्ती आहे महिषासुराचा वध करताना, पण देवळात शिरताना बाहेर एक शैव द्वारपाल दिसतो. त्याच्या खाली एक बैल-हत्ती एकत्रित केलेला प्राणी दिसतो. एका बाजूने पाहिले तर तो बैल वाटतो, तर दुसऱया बाजून चक्क हत्ती. त्या काळातल्या कलावंतांचं हे वेगळं कौशल्य होतं. तरुण स्त्राr-पुरुष किंवा दोन प्राणी एकत्र करण्याची कल्पना त्या काळातल्या मंडळीत जागृत असावी. तिथे हरिहराची जवळपास साडेसात फुटी उंच मूर्ती आहे. हरिहर म्हणजे अर्धा विष्णू आणि अर्धा शिव. या दोन शक्ती एकत्र आणण्याची निखळ कल्पना सुंदर आहे. विष्णूच्या बाजूला लक्ष्मी आहे आणि शिवाच्या बाजूला पार्वती.

शंकराचं अख्ख कुटुंब या देवळात दाखवलंय. कार्तिकेयही तिथे आहे. कार्तिकेय हा दक्षिणेतला अतिशय लोकप्रिय देव. ज्या बदामी, चालुक्यांनी ही मंदिरं खोदली, त्यांचा तो लाडका देव. या पहिल्या टप्प्यावरून समोर एक सुंदर तलाव दिसतो. त्याचं नाव अगस्त्या लेक. छान निळसर तलाव आहे. बोटीतूनही तो फिरताही येतो. तो त्याच अगस्ती ऋषींचे नाव दिलेला तलाव आहे, जे एका आचमनात समुद्र प्याले होते. स्वा. सावरकरांनी त्यांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या कवितेत समुद्राला चक्क धमकी दिली होती की, ‘‘मला परत घेऊन चल, नाहीतर मी अगस्तींना तुला गिळून टाकायला सांगेन.’’ तो तलाव वरून पाहताना माझ्या डोळय़ांसमोर ते एका आचमनात समुद्र पिणाऱया अगस्ती ऋषींचं रूप आलं. ते वैदिक काळातले हिंदूंचे एक प्रमुख ऋषी. त्यांचे उल्लेख रामायण आणि महाभारतातही सापडतात आणि अतिशय रंजक कथा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला जोडलेल्या आहेत. पुराणकथेतल्या अफलातून कल्पनेच्या भरारीने मी वेडावणारा माणूस आहे, पण त्या कथांकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की, शैव पंथात या अगस्तींचा मान खूप मोठा आहे. तामीळ भाषेच्या व्याकरणाचा शोध त्यांच्या नावावर जातो. ती हिंदुस्थानातली अतिशय जुनी भाषा आहे. अगस्तींना हवं तेव्हा खाण्याचं आणि लगेच पचवण्याचं वरदान होतं. एकदा देवदानवांच्या युद्धात दानव समुद्रात लपले. ते देवांना सापडेनात म्हणून ते समुद्र प्याले आणि त्या दानवांना बाहेर काढले. अगस्ती ऋषींच्या नावावरची आणखी एक कथा आहे ती म्हणजे कल्पनाशक्तीचा कडेलोट आहे. एक वाटापी नावाचा राक्षस त्रास द्यायचा. त्याची माणसं मारायची पद्धत काय, तर त्याचा भाऊ त्याचं मटन करायचा. ज्याला मारायचंय त्याला ते मटन तो भरवायचा. ते मटन पोटात गेल्यावर वाटापी पोटात जिवंत व्हायचा आणि तो माणूस मरायचा. मारण्यासाठी केवढा तो उद्योग आणि आकलनापलीकडचा डावपेच! एकदा तो त्याचे मटन अगस्ती ऋषींना खायला घालतो, पण अगस्ती ऋषींकडे पटकन जिरवण्याची ताकद असल्यामुळे तो वाटापी जिवंत होत नाही. तो मृत अवस्थेत कुठून बाहेर पडला हे मी सांगायची गरज नाही. बदामी शहराला पूर्वी वाटापी म्हणत त्या राक्षसामुळे.आहे की नाही रंजक? पुढल्या वेळी बदामीच्या उर्वरित गुंफा पाहू.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या