
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अलापूर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या ककराला भागातील ‘न्यू होप्स पब्लिक स्कूल’मध्ये पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या 6 वर्षीय तापसीचा मोती गिळल्यामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तापसी शाळेत असताना तिने आपल्या हातातील ब्रेसलेटचा एक मोती तोंडात टाकला आणि तो चावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो मोती तिच्या घशात अडकला आणि तिला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. वर्गातील एका दुसऱ्या मुलीने ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्याध्यापक भूराज सिंह यांनी तातडीने या घटनेची माहिती तापसीच्या पालकांना दिली. तापसीची आजी शाळेत पोहोचल्यानंतर शाळा प्रशासनाने तिला आपल्याच गाडीतून तातडीने बदायूं येथील ईएनटी तज्ज्ञांकडे नेले. मात्र, तिची प्रकृती खालावल्यामुळे तिला सर्जनकडे आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, वेळेवर उपचार न मिळाल्याने या चिमुकलीने प्राण गमावले.
या घटनेनंतर तापसीचे वडील टेकचंद यांनी शाळा प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, मुख्याध्यापक भूराज सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून तापसी आपल्या स्वतःच्या मुलीसारखी होती, असे भावूक उद्गार काढले आहेत. घटनेची सत्यता समोर यावी यासाठी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून प्रशासन तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अलापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक माधव सिंह बिष्ट यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनंतर मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डॉक्टरांच्या विशेष पॅनेलद्वारे शवविच्छेदन केले जाईल. सध्या पोलिसांना या प्रकरणी कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि तक्रारीनंतर तथ्यांच्या आधारे एफआयआर नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


























































