बदलापूर अंडाशय तस्करीप्रकरणी नाशिकच्या डॉक्टरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंडाशय तस्करी प्रकरणाचे धागेदोरे नाशिक, ठाण्यापर्यंत पोहोचल्याचे उघडकीस आल्यानंतर तपासाची चक्रे फिरवली आहेत. आज नाशकातून डॉक्टर अमोल पाटील यांना अटक करण्यात आली असून वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गरीब महिलांच्या गर्भातील अंडाशय काढून विकण्याच्या रॅकेटमध्ये पाटील यांचा सहभाग असून त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पैशाचे लालूच दाखवून थेट गर्भाशयावरच दरोडा टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन महिला व एका औषध विक्रेत्याला अटक केली आहे. या गोरखधंद्यामध्ये नाशिकच्या डॉक्टरचा सहभाग असल्याचे समजताच बदलापूरमधील पोलिसांच्या पथकाने डॉ. अमोल पाटील यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना आज चिखलोली येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मोठे मासे हाती लागण्याची शक्यता

बदलापूर स्त्री बीज प्रकरणात नाशिकमधील डॉक्टरला अटक केल्यानंतर आणखी काही मोठे मासे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ठाणे जिह्यातील सर्व आयव्हीएफ सेंटर्सची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.