बदलापुरात चाललंय तरी काय…चिमुकल्यांवरील अत्याचारांनंतर पैशांचे आमिष दाखवून अंडाशयांची तस्करी, पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या  काही महिन्यांपासून चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनांनंतर अवघ्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असताना आता त्याच बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.  याबाबत माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्या आहेत याचा पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे.

बदलापूरमधील एका पिडीत महिलेने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांशी संपर्क साधला. त्यांना हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व व पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर जोवेली गावात राहणाऱया सुलक्षणा गाडेकर व तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अशी होती मोडस ऑपरेंडी

बदलापूरच्या जोवेली गावातील नॅनो सिटी येथे सुलक्षणा गाडेकर ही महिला राहते. तिने गर्भाशयात स्त्राr बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते. गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून ती हे इंजेक्शन्स देत होती. एवढेच नव्हे तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करवून घ्यायची. गर्भाशयात स्त्राrबिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवत असे. तेथे ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढले जायचे. त्यानंतर त्याची सर्रासपणे विक्री करण्यात येत होती.

इंजेक्शन्स, फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रे जप्त

पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर यांच्यासह तिचे साथीदार अश्विनी चाबूकस्वार व मंजुषा वानखेडे यांना  ताब्यात घेतले. पोलिसांनी गाडेकर यांच्या घरी छापा मारून गर्भाशयासाठी वापरण्यात येणार्या इंजेक्शन्सचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रे, महिलांचे फोटो व अन्य संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. या संवेदनशील प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाचे  अधिकारी आर.जे. गझल हे अधिक तपास करीत आहेत.