मिंधे गटाच्या वामन म्हात्रेला कोणत्याही क्षणी अटक; कल्याण सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

बदलापूरमधील आदर्श शाळेत दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी मिंधे गटाचा शहरप्रमुख वामन म्हात्रे याने अर्वाच्य भाषेत वर्तन केले होते. त्याच्या मुजोरीविरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच म्हात्रे याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आज कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयानेही त्याचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे म्हात्रे याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता आहे.

बदलापूर अत्याचाराच्या घटनेत असंवेदनशीलता दाखवणाऱ्या म्हात्रेला वाचवण्यासाठी मिंधे गटाने राजकीय दबाव आणला. मात्र राज्यभरातून उठाव झाल्यानंतर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. गुन्हा दाखल होताच म्हात्रे याची अटक टाळण्यासाठी पळापळ सुरू झाली. अटक होऊ नये यासाठी म्हात्रे याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र उच्च न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर आज याप्रकरणी कल्याण न्यायालयात न्यायाधीश एम. ए. मोटे यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी म्हात्रे याचा जामीन फेटाळला. यावर प्रतिक्रिया देताना अखेर सत्याची बाजू आज खरी ठरली असे समाधान पीडितेचे वकील अॅड. भूषण बेंद्रे यांनी व्यक्त केले.

आरोपीची तुरुंगात चौकशी करा – सरकारी वकील

सरकारच्या वतीने अॅड. कादंबिनी खंडागळे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी हा पीडितेला पूर्वीपासून ओळखतो. आरोपीला पीडितेची जातसुद्धा माहीत असून भररस्त्यात हावभाव करून तिचा विनयभंग केला. यामागे आरोपीचा नेमका उद्देश काय होता हे अत्यंत गंभीर व संवेदशील असून आरोपीची तुरुंगात चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी खंडागळे यांनी केली. त्याचबरोबर अशा प्रकरणात विविध न्यायालयांनी अर्जदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचा दाखला देत आरोपीविरोधात यापूर्वीच तीन गुन्हे प्रलंबित असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.