बदलापूर अंडाशय तस्करी प्रकरणात चौथी कारवाई, उल्हासनगरच्या सोनोग्राफी सेंटरमधील महिलेला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलापुरातील बेकायदा सरोगसी कांड प्रकरणात सोमवारी रात्री उशिरा चौथी अटक करण्यात आली. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगरच्या सोनोग्राफी सेंटरमधील एका महिला कर्मचाऱ्यावर झडप घालून बेड्या ठोकल्या आहेत. याआधी अंडाशयाच्या दलालीत मुख्य आरोपीसह तीन महिलांना अटक केली होती. त्यामुळे दलालांची साखळी दिवसेंदिवस वाढतच असून बडे मासे हाती लागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोरगरीब महिलांची फसवणूक करून त्यांच्या अंडाशयांचा सौदा करणाऱ्या सरोगसी कांडावरून जोरदार खळबळ उडाली आहे. शेकडो गरजू महिलांना हेरून त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत एका अंडाशयामागे ८० हजार तर या महिलांना आणणाऱ्या दलालांना ३० हजार रुपये दिले जात होते. बदलापुरातील एका पीडित महिलेने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितल्यानंतर या भयंकर कांडाचा भंडाफोड झाला.

ठाणे परिसरातील सोनोग्राफी सेंटरवर लवकरच छापा

उल्हासनगरच्या सोनोग्राफी सेंटरमधून अटक केलेल्या महिलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून चारही आरोपींच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डवरून धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच माहितीच्या आधारे ठाणे परिसरातील काही सोनोग्राफी सेंटरवर लवकरच छापा टाकण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. मात्र या सर्व प्रकाराबाबत प्रचंड गुप्तता पाळली जात आहे