तरुणाची राहत्या घरात हत्या

सामना प्रतिनिधी। बदनापूर

जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील रामखेडा येथील संतोष हनुमान कुरुधनें (23) या तरुणाची राहत्या घरी मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना पहाटे उघडकीस आली असून बदनापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदनापूर पासून दोन किलो मीटर अंतरावर असलेल्या रामखेडा येथे संतोष हा आपल्या आई वडील,भाऊ बहीण यांच्या सोबत राहत होता. 14 मे च्या मध्यरात्री संतोष यांच्या घरात कोणी तरी अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून धारदार शस्त्राने मानेवर वार करून त्याची हत्या केली. 15 मे रोजी सकाळी 6 वाजता ही घटना उघडकीस आली. सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्याने तात्काळ जिल्हा पोलीस उपाधीक्षक सुधीर खिर्डीकर,पोलीस निरीक्षक बी डी गोंदकर ,पोलीस उपनिरीक्षक चैनसिंग गुशिंगे ,जमादार शेख इब्राहिम,सुपेकर आदींनी घटनास्थळ गाठले आणि घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले ,मयत संतोष याचे आई वडील,बहीण भाऊ हे शेजारी बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांच्या घरी झोपण्यासाठी गेलेले होते. तर संतोष हा एकटाच घरात झोपलेला होता. सदर खून कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बी दि गोंदकर करीत आहे. याच तरुणावर मागील सहा महिन्यांपूर्वी रात्री मंदिरात झोपलेला असताना डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता पण त्या वेळी सुदैवाने बचावला होता.