
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी जबलपूरमध्ये एका कार्यक्रमात साई बाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. तसेच त्यांच्याविरोधात काही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्या आहेत. या तक्रारीनंतर धीरेंद्र शास्त्रींनी त्यांच्या वक्तव्याची माफी मागितली आहे. त्यांनी ट्विटरवरून माफी मागितली.
मध्य प्रदेशात जबलपूर येथे शनिवारी धीरेंद्र शास्त्री भगवत गीतेचे पारायण करत होते. यावेळी शास्त्र्ााr आणि उपस्थित भक्तांमध्ये खुली चर्चा सुरू होती. त्यावेळी एका भक्ताने साईबाबांची पूजा करावी की नको असा सवाल केला. त्यावर बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी ‘गीदड की खाल ओढकर कोई शेर नाही बन सकता’ (गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही) असे वक्तव्य करत साईबाबांना ईश्वर मानण्यास नकार दिला. आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साईबाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्य यांचे मत मानणे अनिवार्य आहे. त्यांच्या मताचे पालन करणे प्रत्येक सनातनी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत, कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत किंवा दुसऱया धर्माचे असो, त्यांना ईश्वराचे स्थान देता येणार नाही असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते.
त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, मी नेहमीच संत आणि महापुरुषांचा सन्मान ठेवत आलो आहे आणि कायम ठेवेन. आपल्या शंकराचार्यांनी जे सांगितलं, तेच मी पुन्हा सांगितलं. शंकराचार्यांनी म्हटलंय की साईबाबा संत-फकीर असू शकतात. साईबाबांवर लोकांची वैयक्तिक श्रद्धा आहे. जर कुणी व्यक्ति त्यांना ईश्वर मानत असेल, तर ती त्याची आस्था आहे. आम्ही कोणालाही विरोध करत नाही. माझ्या भाषणातील वक्तव्यामुळे व शब्दामुळे कुणाचं मन दुखावलं गेलं असेल, तर आम्हाला त्यासाठी मला मनापासून दु:ख आणि खेद आहे”, असं या ट्विटमध्ये धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं आहे.


























































