
आतापर्यंत फक्त मुलींच्या कपड्यांवर फतवे काढणाऱ्या खाप पंचायतीने प्रथमच मुलांच्या कपड्यांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. बागपत येथील एका खाप पंचायतीने पुरुषांनी हाफ पँट घालून बाजारात फिरण्याला मनाई असल्याचं म्हटलं आहे.
बागपत येथील बालियान खाप पंचायतचे मुखिया नरेश टिकैत यांनी हे विधान केलं आहे. निकिता तोमर या विद्यार्थिनीच्या हत्येवर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की जोवर कायदे कडक होत नाहीत, तोवर छेडछाड थांबणार नाही.
ज्या प्रकारे तिची हत्या झाली, त्याची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे. सरकार कारवाई करत आहे, पण अजून ती कडक झाली पाहिजे. आपल्या मुली शाळेत जातात, तेव्हाही त्यांना छेडछाडीला सामोरं जावं लागतं, असं ते म्हणाले आहेत.
ग्रामीण भागात आजकाल तरुण पिढी हाफ पँट घालते. ते योग्य दिसत नाही. त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः बाजारात पुरुषांनी हाफ पँट घालून येऊ नये, असं त्यांना बजावण्यात आलं आहे.
यापूर्वीही आम्ही मुलींनी जिन्स पँट घालण्याला विरोध केला होता. आमचं ऐकून मुलींनी तसं वागायला सुरुवातही केली. पण, आम्हाला मुलांवरही बंदी घालण्यास सांगण्यात आलं तेव्हा, आम्ही मुलांवरही अर्धी पँट घालण्यास बंदी घातली आहे.



























































