
‘बुलंद भारत की बुलंद तसबीर…हमारा बजाज’ ही बजाज ऑटोच्या ‘चेतक’ या स्कूटरची जाहिरात आजही अनेकांना आठवत असेल. 1972 पासून 34 वर्षे हिंदुस्थानच्या रस्त्यांवर दिमाखात धावणार्या चेतकची विक्री 2006 पासून बंद करण्यात आली होती. आता पुन्हा 14 वर्षांनी बजाज चेतक नव्या आधुनिक रूपात दाखल होत आहे. बजाज ऑटोने आपली ही पहिलीच इलेक्ट्रिक चेतक स्कूटर नुकतीच दिल्ली येथे लाँच केली. विविध सहा रंगांमधील बजाज चेतकला इको आणि स्पोर्टस् मोड देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ऍण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम, लिथियम आयन बॅटरी, मोनोशॉक सस्पेन्शन, दोन्ही टायर्सना डिस्क ब्रेक, टय़ूबलेस टायरही त्यात आहे. चाकण येथील प्रकल्पात या नव्या चेतकचे उत्पादन सुरू करण्यात आले असून येत्या जानेवारीपासून या स्कूटर प्रत्यक्ष रस्त्यावर दिसू लागतील. सध्या ती फक्त सादर केली गेली आहे. देशात दुचाकी बनवणार्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

























































