महिला पैलवानांच्या सन्मानासाठी बजरंगची मोठी घोषणा, ‘पद्मश्री’ सन्मान परत केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाच्या आरोपांनी बरबटलेल्या बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे ‘डब्लूएफआय’चे नवे अध्यक्ष झाले आहे. यानंतर ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकने अश्रू अन् हुंदके आवरत तडकाफडकी कुस्तीला रामराम ठोकण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता बजरंग पूनिया यानेही आपल्या पद्मश्री हा सन्मान परत केला आहे. पंतप्रधान निवासस्थानाबाहेरील फूटपाथवर त्याने तो सन्मान ठेवून दिला आहे. हा पुरस्कार परत करताना बजरंगने यासंबंधीचं एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.

‘डब्लूएफआय’च्या अध्यक्षपदासाठी गुरुवार, 21 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली. उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष व ‘डब्लूएफआय’चे मागील संयुक्त सचिव असलेल्या संजय सिंह यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 47 पैकी 40 मते मिळाली, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या अनिता श्योराण यांना केवळ 7 मते मिळाली. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेले भाजपचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचाच हा विजय मानला जात आहे. पण, त्यामुळे गेल्या वर्षीपासून बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करणाऱ्या महिला पैलवानांची मात्र घोर निराशा झाली आहे. गेल्यावर्षीपासून त्यांच्यावरील कारवाईसाठी पैलवानांनी आंदोलन छेडलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई सुरू झाली पण त्यांचं आंदोलन चिरडण्यात आलं. हे सगळं सुरू असताना पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी मात्र मौन धारण केलं होतं. महिला पैलवानांना संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळाल्यानंतर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून तपासाचे आदेश देण्यात आले होते.

शुक्रवारी बजरंग पूनिया याने आपला पद्मश्री हा सन्मान परत केला आहे. त्यासंबंधीचं पत्रही त्याने पंतप्रधानांना लिहिलं आहे. तुम्ही देशसेवेत मग्न असाल. पण, त्या व्यग्रतेत मी तुमचं लक्ष कुस्तीवर वेधू इच्छितो. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात महिला पैलवानांच्या आंदोलनात मीही सहभागी होतो. 21 डिसेंबर रोजी कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण यांच्या गटातील उमेदवाराचा विजय झाला. आपला दबदबा होता आणि राहील अशा अर्थाचं विधानही त्याने केलं आहे. म्हणजे लैंगिक शोषणाच्या आरोपीने जाहीरपणे महासंघावर आपला दबदबा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच साक्षी मलिकने संन्यास घेतला आहे. आम्हाला कुस्तीने खूप काही दिलं. जेव्हा कुठेही जातो तेव्हा आम्हाला आम्हाला मिळालेल्या सन्मानाची आठवण होते. पण, या निकालानंतर हाच सन्मान मिळण्यापासून महिला पैलवान वंचित राहणार आहेत. त्यामुळे मीही हा सन्मान परत करत आहे, असं बजरंग याने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ –