भिंद्रनवालाचा दहशतवादी उल्लेख, बालभारती पुस्तकातील धडा वगळण्यास सरकारचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

सुवर्णमंदिरातील ब्लू स्टार ऑपरेशनमध्ये मारला गेलेला खलिस्तानी नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाला याचा दहशतवादी असा उल्लेख असलेला नववीच्या बालभारती पुस्तकातील धडा वगळण्यास अथवा त्यात बदल करण्यास राज्य सरकारने आज हायकोर्टात स्पष्ट नकार दिला. तब्बल 30 जणांचा समावेश असलेल्या तज्ञांच्या समितीने या पुस्तकातील मजकूर नजरेखालून घातल्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती छापण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे या पुस्तकातील हा धडा वगळण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे आम्ही कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही, असेही राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील व्ही. ए. थोरात यांनी न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठास सांगितले.

नववीच्या बालभारती पुस्तकात खलिस्तानी चळवळीचा तत्कालीन नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाला याच्यावर एक धडा असून या धडय़ात भिंद्रनवाला याचा दहशतवादी असा उल्लेख करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरुद्ध मुंबईतील एक वकील अम्रितपालसिंग खालसा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी आज दुपारी वरील खंडपीठासमोर झाली. दरम्यान, याचिकेवरील निकाल खंडपीठाने राखून ठेवला.