
रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह इतर सहा आरोपींच्या विरोधात जवळपास 300 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 25 जणांच्या जबाबांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज किंवा उद्या (दि. 8) हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.
रेखा जरे हत्याकांड प्रकरणामध्ये बोठे हा मुख्य आरोपी आहे. घटना घडल्यानंतर सुरुवातीला तो तीन महिने फरार झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाच पथके त्याच्या शोधासाठी पाठवली होती. त्याचा शोध घेत असताना तो हैदराबाद येथे असल्याचे समजताच या पथकाने तेथून त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. बाळ बोठे समवेत चार साथीदार होते. त्या चार साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमध्ये एक महिला आरोपी असून, तिचा अद्यापपर्यंत ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 आरोपींचा समावेश करण्यात आलेला आहे.
बाळ बोठेला अटक झाल्यानंतर त्याने पोलीस तपासामध्ये विविध माहिती दिली आहे. ज्यावेळी घटना घडली व तो फरार झाला होता त्यावेळी तो पहिले दहा दिवस नगर येथे असल्याचे चौकशीत उघड झाले. त्याने पहिले दहा दिवस नगरच्या रेल्वे स्थानकावर मुक्काम केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच एका पोलिसाच्या मोबाईलवरून त्याने काही जणांशी संपर्क साधल्याचेही सांगितले होते. त्यामुळे तपासी अधिकाऱयांनी रेल्वे पोलिसांना पत्र लिहून माहिती मागवली होती. ती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही. तसेच काही जणांना जबाबासाठी बोलविण्यात आले होते.
लवकरच रेल्वे पोलिसांचे जबाब होणार
या संदर्भामध्ये तपासी अधिकारी अजित पाटील यांनी रेल्वे पोलिसांना पत्र देऊन बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना जबाबासाठी बोललेले आहे. अद्यापपर्यंत त्यांचे
जबाब होऊ शकलेले नाहीत. बोठे याला अटक केल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये आता पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले जाणार आहे.






























































