“बाल संजीवन छावणी”चे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जव्हार/पालघर

कुपोषण मुक्ती अभियानातील अभिनव अशा ‘बाल संजीवन छावणी’चे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टने श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेच्या एकत्रित उपक्रमातून जव्हार येथे ही छावणी उभारली आहे. संजीवन छावणी समाजाला आदर्श देणारे केंद्र असून विवेक पंडित यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अमृता फडणवीस यांनी यावेळी काढले. कुपोषण निर्मूलनाच्या चळवळीतील हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे त्या म्हणाल्या. एकही बालक भुकेला राहणार नाही हे स्वप्न बाळगून आम्ही हे केंद्र उभारले आहे. हे केंद्र गरिबांच्या दारिद्र्यमुक्तीचे आणि कुपोषित बालकांच्या भूकमुक्तीचे केंद्र असेल असे विवेक पंडित यांनी सांगितले. या छावणीच्या उभारणीसाठी योगदान दिलेल्या प्रत्येकाचे आभार त्यांनी व्यक्त केले.

जव्हार मोखाडा या कुपोषणाचा प्रभाव असलेल्या भागात श्री विठू माऊली ट्रस्टच्या सहकार्यातून हे अभिनव केंद्र जव्हार येथे उभारले आहे. या अभियानात मीरा भाईंदर येथील सफाई कामगारांनी मोठे योगदान दिले आहे. तसेच समाजातील विविध घटकांनी मदत केल्याने ही बाल संजीवन छावणी उभी राहिली आहे. या भागातील कुपोषणाबाबत झालेल्या आंदोलनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच दखल घेतली, असे पंडित यांनी सांगितले. आतापर्यंतच्या सरकारने बालमृत्यूबाबत आजारांचे कारण दिले. मात्र, कुपोषण हेच बालमृत्यूचे मुख्य कारण आहे, हे मान्य करून फडणवीस सरकारने उपाय शोधायला सुरुवात केली. त्यामुळे पंडित यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

या छावणीला खासदार निधीतून मदत करणारे खासदार राजेंद्र गावित यांनी मनोगत व्यक्त करत विठू माऊली ट्रस्ट आणि विवेक-विद्युल्लता पंडित या दाम्पत्याने केलेल्या कामाचे कौतुक केले. संजीवन छावणीसारख्या विधायक कामांना निधी देण्याचे आवाहन त्यांनी लोकप्रतिनिधीना केले. कुपोषणाचा आकडा शून्यावर येण्यासाठी विवेक पंडित,त्यांची संघटना आणि सरकार असे एकत्र प्रयत्न करू असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी संजीवन छावणीसाठी एक रुग्णवाहिका देणार असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. कार्यक्रमासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे , पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित,रवींद्र फाटक,श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.