बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचा तळ पुन्हा सक्रीय, गुप्तचर यंत्रणांनी केले ऍलर्ट

बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. हिंदुस्थानविरोधात हल्ला करण्यासाठी या तळावर 27 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पाकिस्तानचा हा दहशतवादी तळ हिंदुस्थानी हवाई दलाने गेल्या वर्षी फेबुवारीत एअर स्ट्राईक करून उद्ध्वस्त केला होता.

जम्मू-कश्मीरातील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्याला चोख प्रत्युत्तर देत हिंदुस्थानी हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. त्या हल्ल्यामुळे वचक बसलेल्या जैश-ए-मोहम्मदने पुन्हा हिंदुस्थानविराधात दहशतवादी कट-कारस्थाने सुरू केल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. बालाकोट तळ सध्या दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मुलगा युसूफ अजहर चालवित आहे. तो हिंदुस्थानविरोधात हल्ला करण्यासाठी 27 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. यातील आठ दहशतवादी पाकिस्तानव्याप्त कश्मीरमधील असून त्यांना पाकिस्तानच्या पंजाबमधील दोन तर अफगाणिस्तानच्या तीन प्रशिक्षकांकडून हल्ल्याचे धडे देण्यात येत आहेत.

आठवडाभरानंतर घुसखोरीचा प्रयत्न
जम्मू-कश्मीरातील कलम 370 हद्दपार झाल्यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा कट रचला आहे. या हल्ल्यासाठीच दहशतवाद्यांना आठवडाभरात पूर्णपणे प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यानंतर दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरी कण्याचा प्रयत्न करतील, असे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. हिंदुस्थानने गेल्या वर्षी फेब्रुवारीत बालाकोट तळावर हवाई हल्ला केला, त्यावेळी तेथे 300 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते.

आपली प्रतिक्रिया द्या