शेतकऱ्यांना जादा दर मिळावा यासाठी शेती अधिकाऱ्यांनी माहिती घ्यावी – बाळासाहेब पाटील

शेती अधिकाऱ्यांनी ऊस तोडणी, वाहतूक खर्च, कमिशनबाबत सहकारी कारखान्यांमध्ये समान राहील याकडे लक्ष द्यावे, अडचणी व समस्या कारखाना व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. ऊस तोडणी वाहतूक खर्चात बचत कशी होईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा मिळेल याकरिता शेती अधिकारी यांनी कारखाना व्यवस्थापनात आवश्यक ती माहिती वेळोवेळी घ्यावी, अशी सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेती अधिकाऱ्यांना केली.

सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर आयुक्तालय (पुणे) येथे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील चालू गाळप हंगामाबाबत शेती अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. संचालक प्रशासन उत्तम इंदलकर, सहसंचालक विकास पांडुरंग शेळके, सहसंचालक उपपदार्थ डॉ. संजय कुमार भोसले, साखर आयुक्तालयातील अधिकारी उपस्थित होते.

शेती अधिकाऱ्यांना स्वच्छ ऊस पुरवठा होण्याकडे लक्ष द्यावे आणि चालू गळीत हंगामात ऊस शिल्लक राहणार नाही त्यादृष्टीने शेती अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. शेती अधिकाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर शासन निश्चित विचार करेल त्याकरिता आवश्यक प्रस्ताव सादर करावेत असे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले .

साखर कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या ऊस तोडणी व वाहतूक प्रश्न, सहकारी कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांच्या यंत्राद्वारे ऊस तोडणी, अंगद गाडी, बाईंडिंग मटेरियल, ऊस तोडणी वाहतूक खर्च मुकादम कमिशन इत्यादी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. पुढील वर्षीच्या हंगामात देखील उसाचे उत्पादन जास्त होणार असल्याने शेती विभागाने दक्ष राहून कार्यवाही करण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या