बाळासाहेब आणि दत्तू बांदेकर

669

>> अरुण दत्तू बांदेकर

प्रसिद्ध विनोदी लेखक कै. दत्तू बांदेकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे परमस्नेही होते. 1956 ते 1959 या काळात बाळासाहेबांनी दत्तू बांदेकरांच्या अनेक विनोदी लेखांसाठी व्यंगचित्रे रेखाटली होती. बांदेकरांच्या संपादनाखाली प्रसिद्ध होणाऱया ‘नवयुग’नामक साप्ताहिकासाठीसुद्धा बाळासाहेबांचा कुंचला सदैव सिद्ध असायचा. एका लेखासाठी तर बांदेकरांचेच व्यंगचित्र बाळासाहेबांनी चितारले होते. दुर्दैवाने 4 ऑक्टोबर 1959 रोजी दत्तू बांदेकरांचे निधन झाले आणि तो नित्यक्रम खंडित झाला. बाळासाहेबांच्या हृदयात मात्र ती मैत्री कायमची रुजली होती. म्हणूनच 1990 मध्ये काही कामानिमित्त बाळासाहेब मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लबमध्ये आले असताना मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांच्या अर्थात के. दत्तू बांदेकरांच्या काही आठवणी मला सांगितल्याच शिवाय बांदेकरांचे कायमस्वरूपी स्मारक म्हणून प्रभादेवीत दै. ‘सामना’ मार्गाच्या नाक्यावरील चौकास ‘कै. दत्तू बांदेकर चौक’ हेच नाव देणार असल्याचा ठाम मनोदयही व्यक्त केला. दिलेला शब्द पाळायचाच ही तर बाळासाहेबांची स्वभाववृत्तीच! त्यानुसार लगेचच म्हणजे 23 जानेवारी 1991 राजी आपल्या 64 व्या वाढदिवसाच्या शुभदिनी बाळासाहेबांच्या हस्ते कै. दत्तू बांदेकर चौक नामकरण सोहळा संपन्न झाला. बाळासाहेबांचे हे ऋण बांदेकर कुटुंबीय कधीच फेडू शकणार नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या