
आम्ही कायम काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. निष्ठा व तत्त्वांमध्ये कधीही तडजोड केली नाही. राधाकृष्ण विखे यांनी मागील साडेचार वर्षांत काँग्रेसमध्ये राहून केलेले पक्षविरोधी काम सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘पक्ष बदलण्यासाठी राधाकृष्ण विखे यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो आहे. त्यांच्या वक्तव्याला मीच काय पण कुणीही महत्त्व देत नाही. आपण संकटाच्या काळात कायम काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलो. कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष सोडण्याचा विचारही कधी मनात आला नाही. अडचणीच्या काळात काम केले आणि करत राहणार आहे. उलट मागील साडेचार वर्षांत पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासह अनेक पदे दिली. त्यांनी कसा पक्ष वाढविला, कसे पक्षविरोधी काम केले हे सगळ्या जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आता ते काय बोलतील याला फार महत्त्व देण्याची गरज नाही.





























































