
तारा वाघिणीचा मुक्काम वाल्मीक पठारावरच असल्याने येथील शेतकरी भीतीच्या छायेत वास्तव्य करीत आहेत. वाघिणीच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.
ताडोबा अभयारण्यातून आणलेली तारा वाघीण ही चांदोली अभयारण्यात सोडण्यात आली होती. मात्र, चांदोली डॅममधून मगरीचा अधिवास असणाऱ्या पाण्यातून दीड किलोमीटरचे अंतर पोहून ती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण तालुका येथील वरचे घोटील, निगडे, कसनी या गावामध्ये तिचा मुक्त संचार आढळून आला. यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुलांना घराबाहेर पडणे असुरक्षित असल्याने मुलांच्या शाळा आणि बाहेर जाण्यावर मर्यादा आल्या आहेत.
शेतात गेल्यावर परत येऊ की नाही, अशा दहशतीत शेतकरी जगत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तारा वाघीण ही वाल्मीक पठारावरील गावांच्या परिसरातच मुक्काम ठोकून बसल्याने वाघिणीच्या भीतीने जनावरांना शेतामध्ये चारण्यासाठी सोडणे मुश्कील झाले आहे. दरम्यान, या वाघिणीला जेथून आणले तेथे परत सोडावे, अशी मागणी कसणी गावचे सरपंच महेंद्र गायकवाड यांनी केली आहे.


























































