
पोलंडचा फुटबॉल सुपरस्टार आणि बायर्न म्युनिच क्लबचा स्टार रॉबर्ट लेवान्डोवस्कीने अर्जेंटिनाच्या स्टार आणि यंदाच्या बलोन डी ओर पुरस्कार विजेता लिओनेल मेस्सी आणि इजिप्तच्या मोहम्मद सालाहला मागे टाकत या वर्षाचा फिफा सर्वोत्तम फुटबॉलपटू हा मानाचा ‘किताब पटकावला. अर्जेंटिनाला 2021 चा कोपा अमेरिका चषक मिळवून देणारा मेस्सी या स्पर्धेत दुसरा तर लिव्हरपूल क्लबचा स्टार मोहम्मद सालाह तिसऱया स्थानी राहिला.
लेवांन्डोवस्कीला 200 हून अधिक देशांचे राष्ट्रीय कर्णधार आणि संघ प्रशिक्षकांची पहिली पसंती मिळाली. शिवाय मीडियानेही या पोलिश कर्णधाराला आपली आवड बनवले. मेस्सीने जगभरातील फुटबॉल चाहत्यांकडून लेवान्डोवस्कीपेक्षा दुप्पट मते मिळवली. या स्पर्धेत पहिली तीन स्थाने पटकावणाऱया या फुटबॉल कर्णधारांनीही आपली मते नोंदवली. लेवान्डोवस्कीने आपल्या सर्वोत्तम खेळाडूच्या यादीत मेस्सीला दुसऱया स्थानी ठेवले. तर सालाहने लेवान्डोवस्की आणि स्वतःसह मेस्सीला टॉप तीन स्टार खेळाडूंत स्थान दिले. मेस्सीने नेमार आणि एम्बाप्पेला आपल्यासोबत टॉप तीनमध्ये ठेवले.
लेवान्डोवस्कीने 2020-21 या हंगामात बायर्न म्युनिचला विजेतेपद मिळवून देताना बुंडेस्लिगा लीगमध्ये विक्रमी 41 गोल नोंदवले. त्याने 2021 मध्ये 43 गोल करीत गेर्ड म्युलरचे दोन्ही विक्रम मोडीत काढले.




























































