भोजडे गावात ‘बाळुमामांच्‍या नावानं चांगभलं’च्‍या गजरात पालखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेंद्र सालकर । कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ म्हणत तीन दिवस मुक्कामाला असलेल्या धनगर बांधवांनी ग्रामस्‍थांच्या साथीने वेशीतील गणपती मंदिरापासून वीरभद्र महाराजांच्या मंदिरापर्यंत भंडारा उधळीत जल्लोषात बाळुमामांची पालखी काढली. गेल्या तीन दिवसापासून आपल्या हजारो मेंढ्यासह यांनी भोजडे गावात तळ ठोकला आहे. आदमापुरच्‍या प्रथेप्रमाणे मोठे महत्त्‍व असलेल्‍या सोमवती अमावस्येला जल्लोषात पालखी काढली. या पालखीपुढे डफाच्या तालावर पांढऱ्या रंगाच्या घोड्याने केलेल्या नृत्याने गावकरी मोहित झाले. अनेकजण या सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखीचे स्वागत सरपंच रतन सिनगर, उपसरपंच अजित सिनगर, माजी सरपंच ज्ञानेश्वर सिनगर, अशोक मंचरे आदीसह ग्रामस्‍थांनी केले.

बाळूमामा देवालय आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर कळप नंबर 2 हा ट्रॅक्‍टर ट्रॉलीचा पालखी रथ तळेगाव मळे येथून भोजाडे गावात मुक्कामी आला. पालखीमध्ये नियोजक म्हणून विष्णुपंत गायकवाड (सांगलीकर) शेखर जाधव भडगाव जि. जळगाव यांच्यासह चाळीस पन्नास भक्‍तांचा ताफा जोडीला सुमारे दोन हजार शेळ्या-मेंढ्या घोडा असा ताफा आहे. 1966 पासून बाळूमामाच्या आदमापुर येथून त्याची सुरुवात झाली आहे. अशाप्रकारचे 17 रथ असून त्‍यातील हा कळप नं 2 चा रथ आहे. हा रथ हजारो मेंढ्याच्या कळपासह महाराष्ट्रातल्या गावोगाव पायी फिरत असतो. या रथ यात्रेत सर्व समाजाचे लोक ज्‍यांची बाळूमामांवर श्रद्धा आहे, असे लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने आपली सेवा देण्यासाठी सामील होतात. कुणी मेंढ्यांची राखण करायला घेऊन जातो, कुणी स्‍वयपाकांस हातभार लावतो. ज्‍याला जमेल व झेपेल तशी तो सेवा करतो. अशा प्रकारे भाविक आपली सेवा रुजू करीत असतात. या मेंढरांच्‍या कळपासोबत राहिल्‍याने आपली संकटे, दुखणे बरे होते, अशी अनेकांची श्रध्दा आहे. त्‍यामुळे कोणी दहा कोणी पंधरा कोणी महीना या कळप रथ यात्रेत सामील होऊन आपली सेवा बजावतात.

या पालखीत सकाळी 9 वाजता महादेवाची व बाळुमामाची आरती होते. त्यानंतर मेंढपाळ व मेंढपाळ बनलेले सेवेकरी जेवण करून मेंढ्या घेऊन परिसरात चारण्यासाठी फिरत असतात. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सर्व मेंढ्या घेऊन वाड्यात परत येतात. त्यानंतर गावातील लोक अन्नदान करतात. रात्री 9 वाजता पुन्हा आरती होते व महाप्रसाद घेतला जातो. यात सर्व ग्रामस्‍थ सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. सोमवती अमवस्‍येच्‍या दिवशी श्रीक्षेत्र जेजुरी येथे महादेवाचा अवतार खंडेरायाची मोठी यात्रा भरते. तशीच यात्रा आदमापुर येथे भरते. या यात्रेत लाखो भाविक भंडारा उधळून बाळूमामाच्या नावानं चांगभलं खंडोबाच्या नावानं चांगभलं असा जयघोषात पालखी काढतात. सोमवती अमावस्येनिमित्त धोत्रे ग्रामस्थांनी डाळभट्टीचा महाप्रसाद ठेवला होता. तर मंगळवारी भोजडे ग्रामस्थांच्यावतीने आमटी-भाकरीचा महाप्रसाद ठेवला होता. या महाप्रसादाचा दोन ते अडीच हजार ग्रामस्थांनी लाभ घेतला अशी माहिती कळप नं. 2 चे नियोजक विष्णुपंत गायकवाड व शेखर जाधव यांनी दिली.