केळीला बसतोय करपा रोगाचा फटका

21

सामना प्रतिनिधी । हडोळती

हडोळती परिसरात तीन चार वर्षांपासून लहरी निसर्गाच्या अवकृपेमुळे केळी लागवडीत घट झाली आहे. कांही दिवसांपासून तापमानात कमी जास्त वाढ झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली त्या शेतकऱ्यांच्या केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अगोदरच दुष्काळी परिस्थिती त्यात केळी क्षेत्रात घट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

सद्य स्थितीत केळीची बाग निसवणीच्या मार्गावर आहे. चांगल्या प्रतिच्या व सरासरीसाठी उत्पादक लागवडी पासून आंतर मशागत ठिबक सिंचन, महागडी औषधी यामध्ये केळी उत्पादकांना मोठा खर्च होत आहे. केळीबागेमध्ये कडाक्याच्या थंडीने केळीची पाने पिवळसर पडली आहेत. केळीच्या पानाच्या कडा जळाल्यासारख्या करपट दिसत आहेत. या सर्व परिणामामुळे उत्पादकांनी लावलेला खर्चही निघू शकणार नाही. या करप्याच्या प्रादुर्भावामुळे केळीच्या उत्पादनात घट येणार आहे. करप्याच्या आपत्तीतून केळीला वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आला असून तो वाया जाण्याच्या शक्यतेने उत्पादक शेतकरी हादरले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

हडोळती येथील शेतकरी मल्लिकार्जुन बसलींगअप्पा निजवंते यांची तीन एकर जमीन असून त्यांनी अल्प पाण्यावर ठिबकच्या माध्यमातून दोन एकरमध्ये पाच हजार केळीच्या बेण्याची जूनमध्ये लागवड केली होती परंतु केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे निजवंते हताश झाले. अगोदरच निसर्गाचा लहरीपणा, अल्प पर्जन्यमान आणि त्यातच ‘दुष्काळात तेरावा महीना’. साधारणत: दिड लाखापर्यंत खर्च करून ६ x ५ फुटांच्या अंतरावर त्यांनी ५ हजार बेन्याच्या केळीची लागवड केली होती. तरीही त्यांच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे ते हताश झाले आहेत. उर्वरीत एक एकर जमीनीवर संसाराचा गाडा कसा चालवायचा, अशा विवंचनेत निजवंते यांनी दै. “सामना”शी बोलताना खंत व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या