वांद्रय़ात दरोडय़ाचा प्रयत्न फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे येथील एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या पाच जणांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. शाहरुख शेख, जिशान मन्सूर, सय्यद जफर अब्बास, अंजुम शाहरुख शेख, राजू अशी त्या पाच जणांची नावे आहेत. आरोपीकडून पोलिसांनी चाकू, चॉपर आणि दरोडय़ाचे साहित्य जप्त केले आहे. शाहरुख आणि जिशानविरोधात देवनार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

वांद्रे येथील एका ज्वेलर्सवर काही जण दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांच्या पथकातील पोलिसांनी बॅण्डस्टॅण्ड परिसरात सापळा रचला. शुक्रवारी रात्री पाच जण रिक्षाने बॅण्डस्टॅण्ड येथे आले. तेव्हा पोलिसांनी त्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी चाकू, चॉपर, स्क्रू डायवर असे दरोडय़ाचे साहित्य जप्त केले आहे. शाहरुख हा मुख्य सूत्रधार असून त्याने दरोडा टाकण्यासाठी पत्नीलाही सोबत आणले होते.

अटक आरोपी हे गोवंडी परिसरात राहत असून ते रिक्षाने वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड येथे आले होते. दरोडा टाकल्यानंतर ते पुन्हा रिक्षाने गोवंडी येथे जाणार होते. त्या पाच जणांविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जिशानविरोधात मारामारी आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे, तर शाहरुखविरोधात जबरी चोरी, विनयभंग, सरकारी कर्मचाऱयाला मारहाण करणे, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. तो रेकॉर्डवरचा आरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या पाच जणांना आज अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.