वांद्रे येथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन , परिपत्रकाची केली होळी

शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देणाऱया शिक्षण संचालकांच्या परिपत्रकाची वांद्रे येथे बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने होळी करण्यात आली. दरम्यान, हे अन्यायकारक परिपत्रक रद्द करून शिक्षकेतर कर्मचारी भरती मार्गातील अडचण दूर करा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना संघटनेकडून देण्यात आले.

शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या पदभरतीवरील स्थगीती उठवावी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱयांचे इतरही प्रलंबित प्रश्न सोडवावेत, या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष देविदास पंडागळे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी परिपत्रकाची होळी करण्यात आली. त्यानंतर संघटनेच्या अध्यक्षासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सरकार्यवाह सुनील खाडे, उपाध्यक्ष प्रिया पवार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.