
नगर जिल्ह्यात एका महिलेचे एचडीएफसी बँकेचे खाते हॅक करून खात्यातून 79 हजार 844 रुपयांचा अपहार केल्याची घटना घडली आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फातिमा हुजेफा बोहरी (वय 38, रा. तारकपूर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
फातिमा बोहरी यांनी मैत्रिणीच्या व्हॉट्सऍपवरून कपडय़ांची मागणी केली होती. त्याप्रमाणे एक्स्प्रेसबीस कुरिअर कंपनीद्वारे कुरिअर पाठविण्यात आले होते. परंतु, कपडय़ांचे पार्सल येण्यास उशीर होत असल्याने त्यांनी एक्स्प्रेसबीस कुरिअरचा कस्टमर केअर नंबर गुगलवरून मिळवला. त्यावर फोन करून पार्सलविषयी विचारपूस केली असता लॉकडाऊनमुळे पार्सल मिळण्यास उशीर होत असल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर गुगल पेवर एक रुपया पाठविण्यास सांगितला. यानंतर लगेच त्यांच्या खात्यावरून पाच हजार रुपये कपात झाले. त्यानंतर बोहरी यांनी फोन करून पाच हजार रुपये जमा झाल्याचे कळविले असता चार हजार 999 रुपये पुन्हा पाठवत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर आरोपीने त्यांना एक लिंक पाठवून फॉलो करण्यास सांगितली. त्यानंतर परत 24 हजार 987, तर पाच मिनिटांनी पुन्हा 49 हजार 857 ट्रान्स्फर झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे बोहरी यांनी आरोपीला पैसे खात्यावरून जात असल्याचे सांगितले असता आरोपीने फोन कट केला. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.




























































