लाच मागणाऱ्या बँकेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तारण ठेवलेल्या जमिनीची विक्री करण्यासाठी परवानगी देण्याकरिता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती पोटे यांनी एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार बुधवारी सापळा लावण्यात आला. मात्र याचवेळी पोटे यांनी तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अँटी करप्शन विभागाचा सापळा फसला असला तरी या कृत्यासाठी सीईओ पोटे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या घटनेत तक्रारदाराने बँक अध्यक्षांवरही पैसे मागीतल्याचा आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी 2012 मध्ये शेतजमीन बँकेकडे तारण ठेवून वैयक्तीक कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते. त्यांनी तारण जमीनीपैकी 1.5 एकर जमीन विकण्याबाबत आणि खात्याच्या नूतनीकरणाबाबत अर्ज केला होता. तो बँकेच्या मासिक सभेत मंजूरही झाला होता. मात्र, विक्री परवानगी देण्यासाठी पोटे यांनी स्वतःसाठी आणि बँकेच्या अध्यक्षांसाठी एक लाखाच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत तथ्य आढळल्याने बुधवारी सापळा रचण्यात आला. मात्र, पोटे यांनी लाच स्विकारण्यास नकार दिला. पोटे यांच्यावरील गुन्हा सिद्ध होत असल्याने त्यांना अटक करून पुढील तपास सुरू आहे. तक्रारदारांने अध्यक्षांनीही लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.