
केंद्र सरकारने दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविiरुद्ध बँक अधिकार्यांनी येत्या 26 आणि 27 सप्टेंबरला संप पुकारला आहे. त्यानंतर 28 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आणि 29 सप्टेंबर रोजी रविवार आहे असे सुट्टीचे दिवस आहेत. सोमवार व मंगळवार (30 सप्टेंबर, 1ऑक्टोबर) असे दोन दिवस बँक कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. त्यानंतर लगेच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी राहील. संप आणि सुट्ट्या मिळून आठवडाभर बँका बंद राहणार आहेत. तेव्हा महिनाअखेरीस बँकेशी संबंधित कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण व्यवहार करायचे असल्यास ते 25 सप्टेंबरपर्यंत उरकावे लागणार आहेत.
केंद्र सरकारने देशातील दहा बँकांचे विलीनीकरण करून चार मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँकेचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण होईल. सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत, अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँकेत विलीन होतील. या निर्णयाला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांनी विरोध दर्शविला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. या संपाला सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. संपूर्ण देशभरात संप पुकारण्यात आला असल्यामुळे त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. एक आठवडा बँक बंद राहणे अडचणीचे ठरणार आहे. बँका बंद राहणार असल्याने एटीएमवर ताण पडणार आहे. सरकारने संघटनांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेण्याची तयारी दर्शविल्यास संप मागे घेण्याचा अंदाज आहे.



























































