
सामना प्रतिनिधी । वसई
कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष, बसिन कॅथॉलिक सहकारी बँकेचे संचालक असलेले दिलीप माठक यांनी आज सायंकाळी पाचूबंदर येथील त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नैराश्यामुळे माठक यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी माठक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला असून बुधवारी सकाळी कोळीवाडा येथील सेंट पिटर चर्च येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सामाजिक क्षेत्रातही माठक यांचे कार्य उल्लेखनीय होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने वसईतील सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.


























































