बँक कर्मचाऱ्यांचा कडकडीत बंद, देशभरातील बँकिंग ठप्प!

791

पगारवाढ, पाच दिवसांचा आठवडा, फॅमिली पेन्शनमध्ये वाढ आदी प्रलंबित मागण्यांसाठी बँक अधिकारी-कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय, खासगी, प्रादेशिक बँकांच्या बहुतांश शाखांत कडकडीत बंद पाळण्यात आल्याने देशभरातील बँकिंग सेवा ठप्प झाली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वात एकत्र येत मुंबईत आझाद मैदान येथे अधिकारी-कर्मचाऱयांनी बँकर्स व केंद्र सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने करत संताप व्यक्त केला.

बँक कर्मचाऱयांच्या संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाला देशभरात प्रतिसाद मिळाला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सअंतर्गत 9 संघटनांचे 20 राष्ट्रीयीकृत 8 जुन्या जमान्यातील खासगी बँका, 6 विदेशी बँका, 46 प्रादेशिक ग्रामीण बँकांतील 10 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. मुंबईतील मेळाव्यात सुभाष सावंत, कॉ. जगदीश शृंगारपुरे, नीलेश पावरा, जयराम पुजारी, रामनाथ किणी, योगेश बीडकर यांनी मार्गदर्शन केले.

11 मार्चपासून पुन्हा तीन दिवस बंद, 1 एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा
सरकारसोबत पगारवाढीची बोलणी फिस्कटल्यामुळे सर्व बँक कर्मचारी संघटनांनी दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी बँका बंद राहणार असून 2 फेब्रुवारी रोजी रविवार आहे. दोन दिवसांच्या संपानंतरदेखील सरकारने सामंजस्याची पगारवाढीची मागणी मान्य न झाल्यास 11, 12 व 13 मार्च रोजी पुन्हा तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्यथा 1 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या