अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; बँक ऑफ बडोदाकडून RCom चं कर्ज खातं ‘फ्रॉड’ म्हणून घोषित

एकेकाळी टेलिकॉम क्षेत्रातील रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) आणि त्याचे माजी संचालक अनिल अंबानी यांच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक ‘बँक ऑफ बडोदा’ने RCom आणि अनिल अंबानी यांच्या कर्ज खात्यांना थेट ‘Fraud’ म्हणून जाहीर केलं आहे. ही माहिती बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनातून समोर आला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार बँकेने स्पष्ट केलं आहे की ही कारवाई RCom कंपनी दिवाळखोरीत जाण्यापूर्वी घेतलेल्या कर्जांबाबत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या कंपनी आणि तिच्या माजी संचालकांच्या भोवतीचं आर्थिक संकट आणखी गडद झालं आहे.

RCom सध्या इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (IBC) अंतर्गत दिवाळखोरी प्रक्रियेत आहे. कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे की ज्या कर्जांवरून वाद सुरू आहे ती कर्जं दिवाळखोरीपूर्व काळातील आहेत आणि त्यांचा निपटारा केवळ रिझोल्यूशन प्लॅननुसार किंवा कंपनीच्या मालमत्तेचं लिक्विडेशन करूनच व्हायला हवा. सध्या कंपनीचा कारभार रिझोल्यूशन प्रोफेशनल अनिश निरंजन नानावटी यांच्या देखरेखीखाली आहे. अनिल अंबानी आता कंपनीचे संचालक नाहीत.

या कारवाईवर अनिल अंबानींच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देताना सांगितलं, ‘अनिल अंबानी हे कधीच कंपनीचे कार्यकारी संचालक नव्हते आणि दैनंदिन कामकाज किंवा निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग नव्हता. हे प्रकरण तब्बल २०१३ सालचं आहे’.

प्रवक्त्याने पुढे स्पष्ट केलं, ‘अनिल अंबानी यांनी २००६ पासून २०१९ मध्ये राजीनामा देईपर्यंत फक्त नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणूनच जबाबदारी सांभाळली. इतक्या वर्षांनी काही निवडक कर्जदारांनी टप्प्याटप्प्याने आणि निवडकपणे कारवाई करून त्यांना लक्ष्य केलं आहे’.

प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, अनिल अंबानी यांनी सर्व आरोप फेटाळले असून ते याविरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहेत.

दरम्यान, RCom साठी तयार केलेला कर्जफेड आराखडा (Resolution Plan) कर्जदारांच्या समितीने मंजूर केला असून त्याला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाची (NCLT) अंतिम मंजुरी मिळणं बाकी आहे.