हिंदुस्थानात बंदी घातलेल्या चायनीज ऍप्सची पुन्हा एण्ट्री!

हिंदुस्थान-चीन सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तक चिनी मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आता हीच ऍप्स नव्या रूपात युजर्सपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न चिनी कंपन्यांनी सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांत प्ले स्टोअरवर चायनीज ऍप्सची संख्या वाढताना दिसत असून हिंदुस्थानातील कोटय़वधी लोकांनी ती डाऊनलोड केल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून पुढे आली आहे.

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करू पाहणाऱ्य़ा आणि युजर्सची माहिती परस्पर अन्य कंपन्यांना देण्याच्या कारणावरून केंद्र सरकारने सुरुवातीला टिकटॉकसहित 59 ऍप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलै महिन्यात 47 आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 118 चायनीज ऍप्सवर हिंदुस्थानात बंदी घातली आहे. बंदी घातलेली हीच ऍप्स आता नाव आणि डिझाईनमध्ये बदल करून प्ले स्टोअरच्या माध्यमातून पुन्हा हिंदुस्थानात आणण्यात आली आहेत.

स्नॅ व्हिडीओ, ओला पार्टी नावाने नवीन ऍप्स

कुएशू नावाच्या चिनी कंपनीने ‘स्नॅक व्हिडीओ’ नावाचे एक ऍप तयार केल आहे. या ऍपमध्ये युजर्सना शॉर्ट व्हिडीओ मेकिंग ऍप, टिकटॉकसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. गुगल प्ले स्टोअरवर 10 कोटींहून अधिक वेळा हे ऍप डाऊनलोड करण्यात आले आहे. अज्ञात लोकांसोबत चॅट रूम तयार करणे आणि गेम खेळण्याची सुविधा असणाऱ्य़ा हॅगो या ऍपला हिंदुस्थानात बंदी आहे. या ऍपच्या जागी आता ‘ओला पार्टी’ नावाचे ऍप आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या