जर्मनीत रंगणार बाप्पांचा उत्सव

सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांचे खापरपणतू डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते जर्मनीतील फ्रैंकफर्ट येथे येत्या शनिवारी गणरायाची प्रतिष्ठ ापना होणार आहे. ‘नमस्ते लान्जेन’ या भारतीय मंडळाने या गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. तर, रविवारी डॉ. रोहित टिळक बॉन येथील भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे केसरीवाडा गणपती मूर्तीची प्रतिकृती सुपूर्द करणार आहेत.

यंदा पुण्यातील मानाचा पाचवा तुळशीबाग सार्वजनिक गणेश मंडळाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त फ्रैंकफर्ट येथे तुळगीबाग गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 23 ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता रोहित टिळक यांच्या हस्ते केली जाणार आहे. फ्रैंकफर्ट येथील नमस्ते लान्जेन मंडळाची स्थापना महाराष्ट्रासह देशभरातील भारतीयांनी मिळून केली आहे. रोहित पात्रा हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

प्रतिष्ठापना सोहळ्याला जर्मनीसह नेदरलँड, फ्रान्समध्ये राहणारे 400 पेक्षा अधिक हिंदुस्थानी उपस्थित राहणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर डॉ. रोहित टिळक हे उपस्थितांना ‘लोकमान्य आणि सार्वजनिक गणेशोत्सव’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर राजेश दातार, जितेंद्र भुरूक, प्रज्ञा देशपांडे, योगेश सुपेकर आदी पुण्यातील कलाकार मराठी, हिंदी गीतांचा ‘सूरसंगम’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

24 ऑगस्ट रोजी जर्मनीची जुनी राजधानी बॉन येथे गणेशोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी डॉ. रोहित टिळक बॉन मराठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे केसरीवाडा गणपती मूर्तीची प्रतिकृती सुपूर्द करणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष विक्रांत बडवे आहेत.

जर्मनीतील गणेशोत्सवात लोकमान्यांची पगडी

लोकमान्य टिळक यांची पुणेरी पगडी डॉ. रोहित टिळक हे जर्मनीला घेऊन जाणार आहेत. फ्रैंकफर्ट येथील गणेशोत्सवात लोकमान्यांची पगडी पाहता येणार आहे. जर्मनीतील विविध भागांतून तसेच नेदरलँड, फ्रान्स येथून भारतीय लोक पगडी पाहण्यासाठी फ्रैंकफर्ट येथील गणेशोत्सवाला येणार आहेत.