बारकोड पासेस फायद्याचे; मोबाईल चोरीला आळा, बकरा चोरीच्या प्रमाणात घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या देवनार पशुवधगृहात महिनाभर भरलेल्या बकरा मंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पण त्याचबरोबर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि यावेळी बारकोड पासेसची राबवलेली योजना फायद्याची ठरली. कारण यामुळे बकरा चोरी तसेच मोबाईल व पैसे चोरीचे गुन्हे फार घडलेच नाहीत. परिणामी महिनाभर चाललेली बकरा मंडी कोणत्याही डोकेदुखीविना यशस्वी पार पडली. 

बकरी ईदनिमित्त देवनार येथे 31 जुलै ते 14 ऑगस्टदरम्यान बकरा मंडीचे आयोजन करण्यात आले होते. या मंडीसाठी विविध राज्यांतून सव्वादोनशे बकरे आणि साडेनऊ हजार पाडे आणण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात भरणार्‍या मंडीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पालिका प्रशासनाकडून देण्यात येणारे पास न देता यावेळी डिजिटल बारकोड पासेस बकरा विकणार्‍यांना देण्यात आले होते. याचा सर्व यंत्रणांना फायदा झाला. यंदा बकरा चोरीचे केवळ सात गुन्हे घडले. पोलिसांनी ते सातही गुन्हे उघडकीस आणून नऊ चोरांच्या मुसक्या आवळल्या आणि सात बकरे ताब्यात घेतले. बारकोडमुळे पासेस वेळीच ब्लॉक करण्यात आल्याने चोरांना वेळीच पकडण्यास मदत झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रागिणी भागवत यांनी सांगितले.

चोरीचा बकरा विकायला  आला आणि पकडला गेला

बकरा चोरीप्रकरणी देवनार पोलिसांनी नऊ आरोपींना पकडले. त्यात धारावीतील एका तडीपार आरोपीचा समावेश आहे. त्या आरोपीने एक बकरा चोरून मंडीत विकण्यासाठी आणला होता पण त्याच्याकडे बारकोड पास नव्हता. त्यामुळे तो पकडला गेला. शिवाय यावेळी 13 चोरांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यामुळे बकरा तसेच पैसे आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांना यंदा चांगलाच आळा बसला. गेल्या वेळी बकरा चोरीचे 21 गुन्हे होते तर यंदा सातच गुन्हे घडले, पण तेही गुन्हे उघडकीस आणल्याचे भागवत म्हणाल्या.