बारामतीत पुन्हा एक विमान कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात पुन्हा एकदा विमान अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात प्रशिक्षणार्थी विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने वैमानिकाचा जीव बचावला आहे. या घटनेमुळे बारामती विमानतळ परिसरात आणि शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विमान हे एका खासगी अकादमीचे प्रशिक्षणार्थी (ट्रेनिंग) विमान होते. नियमित सरावासाठी या विमानाने बारामती विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे नियंत्रण सुटून विमान जमिनीवर कोसळले.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात विमानाचा चक्काचूर झाला असून मोठे नुकसान झाले आहे. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत योग्य वेळी प्रयत्न केल्याने त्याचे प्राण वाचले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

अजित पवारांचे अपघाती निधन
28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीतच अपघात झाला होता. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज परत अपघात झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.