घडय़ाळवाले आमचे पार्टनर! उद्धव ठाकरे यांचे मिश्किल उत्तर

1431

माळरानाचा कायापालट करणे सोपे नाही. पवार कुटुंबीयांनी बारामतीच्या माळरानाचे नंदनवन केले. हे पवार कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. त्यांची निशाणी घडय़ाळ आहे आणि घडय़ाळवाले आमचे पार्टनर आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणताच एकच हशा पिकला. संदर्भ होता खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाचा. ‘तुमचे घडय़ाळाचे दुकान आहे का?’ असा प्रश्न सुप्रिया यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला होता, त्यावर उद्धव ठाकरे यांनी वरील मिश्किल उत्तर दिले.

बारामती येथील ऑग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित ‘कृषिक 2020’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हा अशिक्षित समजला जातो, पण त्याच्या हुशारीचा किस्सा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितला आणि मग त्यातूनच उसळला ‘घडय़ाळा’चा हंशा. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, दोन दादांनी मला चंद्रपुरातील एका शेतकऱ्याचा किस्सा सांगितला. दोघे म्हणजे अजितदादा आणि दादा भुसे. चंद्रपुरातील त्या शेतकऱ्याने प्रयोग करून करून तांदळाची नवी जात तयार केली. त्या जातीला काय नाव द्यायचे याचा विचार करता करता त्याने हात हलवला तर हातामधल्या घडय़ाळाकडे त्याचे लक्ष गेले. ते घडय़ाळ होते एचएमटीचे. त्यावर त्याने ठीक आहे, एचएमटी तर एचएमटी असे म्हणत त्या तांदळाच्या जातीला ‘एचएमटी’ नाव दिले. यावर व्यासपीठावरून कुणीतरी शेतकऱ्याच्या हातातील ‘घडय़ाळा’चा पुनरुच्चार केला तेव्हा हंशा उसळला. हाच धागा पकडत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हो घडय़ाळ… खासदार सुप्रिया सुळे यांनी मला मघाशी विचारले तुमचे घडय़ाळाचे दुकान आहे का? मी म्हटले, नाही… माझे पार्टनर घडय़ाळवाले आहेत (प्रचंड हंशा)

शेतकऱ्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगतानाच राज्यातील शेतकऱ्यांना पूर्ण ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम्-सुफलाम् करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला. भविष्याचा विचार करून आपल्याला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल असेही त्यांनी सांगितले. आता मातीविना शेती आणि हवेवरील शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक चमत्कार होत असतात. शेतीच्या नवनवीन प्रयोगांचेही चमत्कार याच भूमीत होतील आणि महाराष्ट्राचा शेतकरी देशातील शेतकऱ्यांना नक्की दिशा दाखवेल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, पशू व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि धीरज देशमुख, अभिनेते आमीर खान, इस्राईलच्या दूतावासाचे सल्लागार व आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते डॉ. डॅन अलूफ आदी मान्यवरांसह विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

फुलांचे ताटवे पाहून बालपण आठवले
या प्रदर्शनातील विविध जातीच्या फुलांनी उद्धव ठाकरे यांना आकर्षित केले. ‘हे फुलांचे ताटवे पाहून मला बालपण आठवले. आमच्याकडे बाळासाहेब व माँसाहेब अशा पद्धतीने परसबागेतील म्हणता येईल अशी शेती करत होते’, अशी आठवण त्यांनी सांगितली.

स्टेअरिंग अजितदादांच्या हातात
प्रदर्शनाची पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुरुवातीला खासदार शरद पवार यांच्या मोटारीत बसले होते. राजेंद्र पवार मोटार चालवत होते, परंतु पाहणीनंतर व्यासपीठाकडे जाताना उपमुख्यमंत्री पवार हे सारथ्य करत असलेल्या मोटारीत मुख्यमंत्री बसले. हे छायाचित्र टिपण्यासाठी छायाचित्रकार सरसावले. राज्यातील सत्तेचं स्टेअंिंरग अजितदादांकडे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पवार कुटुंबीयांचे कर्तृत्व नाकारणे हा करंटेपणा
बारामतीत पवार कुटुंबीयांनी उल्लेखनीय काम करून दाखविले आहे. राजकारणात मतभिन्नता असू शकते, परंतु त्यांनी केलेले काम, त्यांचे कर्तृत्व नाकारणे हा करंटेपणा ठरेल, या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पवारांच्या कार्याचे कौतुक केले.
अनेकांना वाटायचं

मी निवृत्त होईन!
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेत खासदार शरद पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याचा धागा पकडत भाषणात खासदार पवार म्हणाले, मला गुच्छ देऊन निवृत्त करायचे ठरवले आहे का? अनेकांना वाटत होतं की मी निवृत्त होईन, पण तसे काही घडले नाही. महाराष्ट्रातील जनतेने, विशेषतः तरुण पिढीने तसे घडू दिले नसल्याचे पवार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या