बारावे घनकचरा प्रकल्पातील कचर्‍याला भीषण आग, धुराने कल्याणवासीयांचा श्वास कोंडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण डंपिंग ग्राऊंडला आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी बारावे येथील घनकचरा प्रकल्प केंद्राला भीषण आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की, संपूर्ण डंपिंग ग्राऊंड बेचिराख झाले. आगीच्या ज्वाळा आणि धुराच्या लोटांनी कल्याण शहर व्यापले होते. धुरामुळे कल्याणवासीयांचा श्वास कोंडला होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे.

कल्याण पश्चिमेच्या बारावे परिसरात रिंग रोडला आणि गांधारी नदीला लागून बारावे घनकचरा प्रकल्प आहे. या प्रकल्पात सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार केले जाते. गेल्या काही महिन्यांपासून हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. मात्र आज या प्रकल्पातील कचर्‍याने पेट घेतला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तत्काळ आग विझवण्याचे काम हाती घेतले. या ठिकाणी सुका कचरा असल्याने आगीने काही क्षणात रौद्ररूप घेतले. मात्र तत्काळ या आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही.

चार मशीन जळून खाक

सुरुवातीला कल्याणहून दोन आग बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची भीषणता पाहून अन्य चार आग बंब मागवण्यात आले. पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या चार मशीन जळून खाक झाल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी मानदेव चौधरी यांनी सांगितले.