
राजस्थानच्या बाडमेरमध्ये पिठाच्या गिरणी यंत्राला शॉक लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून चारही जणं एकाच कुटुंबातील आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बाडमेर येथील आरंग गाव येथील आहे. शुक्रवारी रात्री साधारण 9 च्या सुमारास ही घटना घडली आहे. येथे राहणारे अर्जुनसिंह घरात नव्हते. शुक्रवारी रात्री साधारण 9 च्या सुमारास त्यांच्या पत्नी पिठाच्या गिरणी यंत्रात पीठ दळत होती. दरम्यान अचानक तिला शॉक बसला. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून दोन लहान मुल आईजवळ धावली आणि त्यांनाही शॉक बसला. त्यानंतर त्यांचा किंचाळण्याचा आवाज ऐकून अर्जुनसिंहचे सासरे हठसिंह मुलगी आणि तिच्या मुलांना वाचवायला धावले आणि त्यांनाही शॉक बसला. या अपघातात बापलेकीसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामसर डीएसपी, शिव ठाणाधिकारी, तहसीलदार आणि एसडीएम घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
या घटनेबाबत अतिरिक्त जिल्हा कलेक्टर अंजुम ताहिर समा यांनी सांगितले की, पिठाच्या गिरणी यंत्राला शॉक लागून दोन मुलांसह चारजणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस सध्या घटनेचा तपास करत आहेत.


























































