लोकांना विश्वासात घेऊन बारसू प्रकल्प राबवणार, विनाशकारी प्रकल्प राबवण्यावर सरकार ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्प राज्याच्या हिताचा असून नागरिकांना विश्वासात घेऊन राबवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. या प्रकल्पात गुंतवणूक करणारी सौदी आराम्को कंपनी पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करीत असल्यामुळे आपल्या सरकारी कंपन्या रिफायनरी तयार करतील, असेही ते म्हणाले. फडणवीस यांच्या दाव्यामुळे विनाशकारी प्रकल्प राबवण्यावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

विरोधकांचा ‘अंतिम आठवडा प्रस्ताव’ आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडलेल्या 260 नुसार मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली. बारसू येथे गुंतवणूक करणारी कंपनी आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करणार असल्यामुळे फायदा होणार आहे. हा प्रकल्प राबवण्यासाठी लोकांवर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नसून लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. बारसू रिफायनरीला मोठय़ा प्रमाणात पाठिंबा असून अतिशय कमी संख्येत गावकऱयांचा विरोध असल्याचे ते म्हणाले. कातळशिल्पांचे जतन झालेच पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. या प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार असल्याने विरोध करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.

बारसू विरोधकांना बंगळुरूतून पैसा

बारसूत आंदोलन करणारे विरोधक मुंबईतील ‘आरे’, ‘बुलेट ट्रेन’ला विरोध करीत आंदोलन करीत असल्याचे ते म्हणाले. या आंदोलकांच्या खात्यामध्ये बंगळुरूमधून पैसा येत असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘ग्रीन पीस’ या बंदी असलेल्या संघटनेच्या संपर्कात हे लोक आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.