
बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीसाठी लागणारे माती परिक्षणाचे काम संपले असून या प्रकल्पाला बारसू-सोलगाववासीयांचा विरोध कायम आहे. जबरदस्तीने, दडपशाही करून रिफायनरी राबवू पाहणाऱया सरकारचे श्राद्ध घातले. यावेळी काहींनी मुंडन करीत बोंबा मारून आंदोलनाला पुन्हा सुरुवात केली.
‘आज आम्ही सरकारचे पिंडदान केले आहे. कारण सरकारला असे वाटतेय की आम्ही माती परीक्षण केलं म्हणजे रिफायनरी झाली. पण त्यांनी या भ्रमात राहू नये. तुम्ही आमच्यावर दडपशाही केली या निषेधार्थ आम्ही तुमचं पिंडदान केले आहे’ असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.
माती परीक्षण केलेल्या एका बोअर जवळ हे श्राद्ध घालण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी पिंडदानाचा कार्यक्रमही पार पाडला. ‘सरकार’ असं लिहिलेली पाटी ठेवून सरकारच्या नावाने बोंबा मारण्यात आल्या. यावेळी शशिकांत बाणे, चंद्रकांत बंडबे, गणेश डोंगरे, काशिनाथ गोरुले, दीपक जोशी, देवीदास गुरव यांनी मुंडण केले. भर उन्हात काळय़ा शाईने ‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’ हे घोषवाक्य पाठीवर लिहून आपला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोकण उद्ध्वस्त करण्याचा घाट
कोकणाला जे निसर्गाचे वैभव लाभले आहे ते उद्ध्वस्त करण्यापेक्षा सरकारने कोकणाच्या पर्यटनावर शाश्वत विकास करायला पाहिजे. गोव्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाचा विकास करायला हवा. कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि जैवविविधतेमुळे येथे पर्यटनासाठी अनुकूल वातावरण आहे. पण रोजगारनिर्मितीच्या नावाखाली कोकण उध्वस्त करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचं मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.
सांताक्रुझमध्ये आज अतिमहत्त्वाची सभा
बारसू-सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची अतिमहत्त्वाची सभा उद्या रविवार, 28 मे रोजी संध्याकाळी 4.00 वाजता शेठ चिमनलाल नथुराम हायस्कूल, व्ही.एन. देसाई म्युनिसिपल हॉस्पिटलसमोर, गोळीबार रोड, सांताक्रूझ पूर्व येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी माती परीक्षण थांबवण्यासाठी झालेल्या आंदोलनाचा आढावा, आंदोलनाची पुढील दिशा ठरविणे, राजकीय परिस्थितीचा आढावा, 30 मे रोजी पुण्याची सभा, मुंबईत प्रचार आणि प्रसार तसेच परिसरातील गावे व कोकण-प्रचार-प्रसार याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.






























































