
सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत कावेरी आजी खूपच लोकप्रिय झाली आहे. लेखिका- कवयित्री असलेल्या अभिनेत्री रमा नाडगौडा यांनी ही भूमिका साकारली आहे. रमा नाडगौडा आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. सत्य घटनेवर आधारित ‘आवर्त’ नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. ‘आवर्त’ नाटक रमा यांनी सुचरिता या नावाने लिहिले असून निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य, संकल्पना, वेशभूषा ही जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.
भारत गणेशपुरे सादर करीत असलेले ‘आवर्त’ नाटक सत्य घटनेवर आधारीत असून स्त्रीपात्री दीर्घांक आहे. त्याचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार 16 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, विलेपार्ले येथे होणार आहे. आवर्त म्हणजे भोवरा, ज्यात अडकलेला जीव प्राणपणाने झुंजत रहातो. भोवऱ्यात गरगरून जाताना त्यातून बाहेर पडण्यासाठी सामान्य स्त्रीने केलेल्या एकाकी संघर्षाची ही गाथा आहे. अभिनेत्री शिवकांता सुतार यांनी यातील सरी ही मुख्य भूमिका साकारली आहे.































































